पुणे: हडपसर भागातील रामटेकडी परिसरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील दफनभूमीत दफन केलेल्या नवजात अर्भकाचा मृतदेह उकरून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर वानवडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यातदार महिला शहरातील हडपसर भागात राहायला आहेत. त्यांची 20 वर्षांची विवाहित नात सोलापूर जिल्ह्यातील सांगाोला येथे वास्तव्याला आहे. महिलेची नात प्रसृतीसाठी माहेरी आली होती. त्यानंतर भवानी पेठेतील महापालिकेच्या रुग्णालयात तिची प्रसृती झाली. प्रसृतीनंतर नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीतुन समोर आले. त्यानंतर 1 मार्च रोजी मृत नवजात अर्भकाचे रामटेकडीतील एका दफनभूमीत दफन करण्यात आले. दफन केल्यानंतर तक्रारदार ज्येष्ठ महिलेचे परिचित दफनभूमीत गेले असता नवजात अर्भकाला ज्या भागात दफन करण्यात आले होते. तो भाग उकरल्याचे आढळले. याबाबतची माहिती परिचिताने ज्येष्ठ महिलेला दिली.
माहिती मिळाल्यानंतर, जेष्ठ महिला दफनभूमीत गेल्या. त्यांनी तेथे जाऊन दफनभूमीतील सुरक्षारक्षकांकडे चौकशी केली. तेंव्हा सुरक्षारक्षकाने नवजात अर्भकाचा मृतदेहाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तातडीने नवजात अर्भकाच्या मृतदेहाची अप्रतिष्ठा करण्याच्या हेतूने मृतदेह अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार पोलिसांकडे दिली.
तक्रारीनुसार याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी दफनभूमीस भेट दिली. सुरक्षारक्षकांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.