हडपसर, (पुणे) : मांजरी खुर्द (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माणीक नगर येथील शेतातील गोडावूनमध्ये भेसळयुक्त पनीर बनवनाऱ्या ठिकाणी गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे धाड टाकली.
या कारवाईत सोपान छबुराव साळवे वय 45, रा. दुबेनगर, वाघोली (ता. हवेली) यांच्या गोडावूनमधून 1400 किलो भेसळयुक्त पनीर, 400 किलो जी. एम. एस. पावडर, 1800 किलो एस.एम. पी. पावडर, व 718 लिटर पामतेल असा 11 लाख 56 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. 07) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार सचिन पवार व पोलीस हवालदार रमेश मेमाणे यांना एका खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच अन्न व औषध प्रशासन पुणे यांना पत्रव्यवहार करून एका शेतामध्ये असलेल्या गोडावुनमध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम चालु असल्याबाबत माहिती मिळाली होती.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी युनिट 6 कडील पथक व अन्न व औषध प्रशासनामार्फत धाड टाकली असता सदर ठिकाणी 1400 किलो भेसळयुक्त पनीर, 400 किलो जी. एम. एस. पावडर, 1800 किलो एस.एम. पी. पावडर, व 718 लिटर पामतेल असा 11 लाख 56 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे. पंचांसमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुणे तपासणीसाठी घेवुन उर्वरीत भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आला तर इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहेत. अन्न व औषध प्रशासन, पुणे यांच्याकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशाप्रकारचे अन्नपदार्थ खरेदी करताना सावधानता बाळगावी तसेच असा प्रकार आढळुन आल्यास त्याबाबत अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे तक्रार करावी.
सदरची कामगीरी गुन्हे शाखा, युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, पोलीस हवालदार सुहास तांबेकर, तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडील सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहूल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, अस्मिता गायकवाड, सुप्रिया जगताप, नमुना सहायक एल डब्ल्यु साळवे, यांनी केली आहे.