पुणे : वडगाव बुद्रुक क्षेत्रीय कार्यालयासमोर शुक्रवारी ( 7 मार्च) ला रात्री किरकोळ वादातून दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तक्रारदार जखमी झाले होते. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी निशा रवीशंकर पाताळे (वय 27, रा. महादेवनगर, धायरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाताळे दाम्पत्य शुक्रवारी(7 मार्च) च्या रात्री आठच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरातील क्षेत्रीय कार्यालयाजवळ थांबले होते. तेंव्हा क्षेत्रीय कार्यालयासमोर दुचाकीवरुन तिघे जण आले. त्यानंतर एकाने रस्त्याच्या कडेला लघुशंका केली. त्या वेळी रवीशंकर यांनी ‘रस्त्यात लघुशंका का केलीस? समोर महिला थांबली आहे. दिसत नाही का ? ’, अशी विचारणा केली असता तिघांनी रवीशंकर आणि त्यांची पत्नी निशा यांना शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. रवीशंकर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. हल्ला करून आरोपी दुचाकीवरुन पसार झाले.
दरम्यान, सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन तिघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले याप्रकारणाचा अधिक तपास करत आहेत.