पुणे: रिंग रोड बाबत मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याला गती देण्यासाठी जमिनींच्या मोजणी प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी गावांमधील जमीन मोजणीचे टप्पे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.
दरम्यान, रिंग रोडच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून मंगळवारी(18 मार्च) ला वडाचीवाडी या गावातील 16.5 हेक्टर जागेची मोजणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जमीन मोजणी प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर जमीन मालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून बुधवारी ( 19 मार्च) ला आंबेगाव खुर्द गावातील जमिनीची मोजणी करण्यात आली.
14 हजार 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने ‘पीएमआरडीए’ने दोन रिंग रोडची निर्मिती करण्यास प्राथमिकता दिली आहे. त्यानुसार बाह्य रिंग रोडचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आले आहे. अंतर्गत रिंग रोडचे काम (इनर रिंग रोड) ‘पीएमआरडीए’कडून करण्यात येणार आहे. रिंग रोड 83 किलोमीटर लांबीचा असणार आहे. याचे काम पूर्ण होण्यासाठी14 हजार 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पहिल्या टप्प्यासाठी 30 टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा
अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी 13 गावातील 115 हेक्टर जमिनीचे संपादन जिल्हाधिकारी कार्यालयाने करावे, असा प्रस्ताव ‘पीएमआरडीए’कडून देण्यात आला होता. त्यानंतर या गावातील जमीन मोजणीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी ‘पीएमआरडीए’कडून जिल्हाधिकारी कार्यालयाला 113 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. आतापर्यंत त्यातील पहिल्या टप्प्यासाठी 30 टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आली आहे.
या गावातील भूसंपादनाचा प्रस्ताव
तसेच खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यामधील 44 गावांमधून 743.41 हेक्टर जमीन या रिंगरोडसाठी गरजेची आहे. हा अंतर्गत रिंग रोड पुणे-सातारा रस्त्याला नगर रस्त्याशी जोडणार आहे. त्याचबरोबर रिंग रोडसाठी येवलेवाडी, मांगडेवाडी, वडाची वाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, निगरुडी, भिलारेवाडी, पिसोळी, गुजर-निंबाळकरवाडी,वडगाव शिंदे, सोलू आणि कदमवाकवस्ती या गावातील भूसंपादनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाकडून रिंगरोडसाठी जमिन मोजण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वडाचीवाडी येथील 16.5 हेक्टर जमिनीची मोजणी मंगळवारी(18 मार्च) ला करण्यात आली आहे. त्यानंतर जमीन मालकांकडून संमतीपत्र देण्यासही सुरुवात झाली आहे. आंबेगाव खुर्द येथे पुढील टप्प्यात मोजणी केली जाईल.
– कल्याण पांंढरे (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन)