ओमकार भोरडे
रांजणगाव गणपती: रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीक वसाहत असुन परप्रांतीय कामगारांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवासांच्या 7 कलमी उपक्रमांअंतर्गत सर्व स्तरावरती कामगीरी करण्याच्या अभियानामध्ये सर्व शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदविला आहे.
त्या अनुषंगाने 19 मार्च रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव, ढोकसांगवी, रांजणगाव येथे काही संशयीत व्यक्ती अंमली पदार्थ जवळ बाळगुन त्याची आपल्या ओळखीच्या लोकांना लपुन विक्री करत असल्याची गोपनिय बातमी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना प्राप्त झाली होती. त्यानंतर बाबत प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी शिरुर पोलीस स्टेशन, शिक्रापुर पोलीस स्टेशन व रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एकूण पाच वेगवेगळे पथक तयार करुन कायदेशीर बाबीची पुर्तता केली. त्यानंतर अचानकपणे पोलीस स्टेशन हद्दीतील संशयीतांच्या टपऱ्या, दुकाने, घर इ. ठिकाणी एकुण 9 संशयीत इसमांच्या झडत्या घेतल्या.
अचानकपणे रांजणागाव एमआयडीसी पोलीसांनी वेगवेगळे पथक तयार करुन झडत्या घेतल्याने संशयीत इसमांच्या अवैध हालचालींवरती वचक बसली आहे. त्यामुळे जर कोणी लपुन अवैध अंमली पदार्थाची विक्री करत असतील तर भविष्यात तसे कृत्य करणार नाहीत व केल्यास गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होतील, याची कल्पना संशयीत इसमांना देण्यात आली आहे. तसेच रांजणगाव गणपती येथे एक इसम गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आल्याने त्याच्या विरुध्द एन.डी.पी. एस. काद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाची कोणी चोरुन विक्री करत असल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करण्याबाबत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी नागरीकांना अवाहन केले आहे. नागरीकांच्या सहभागाने नशामुक्त गाव मोहिम यशस्वी होवु शकते. त्यामुळे अंमली पदार्थाची कोणी चोरुन विक्री, व्यसन करत असल्यास उस्फुर्तपणे पोलीसांना माहिती द्यावी. अशी विनंती पोलिसांनी नागरीकांना केली आहे.
सदरची कारवाई प्रशांत ढोले उपविभागीय पोलिस अधिकारी शिरुर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, पोलीस उपनिरीक्षक नखाते, शिरुर पोलिस स्टेशन तसेच सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार नितीन भोस, विलास आंबेकर, अभिमान कोळेकर, विद्या बनकर, शिरुर पोलीस स्टेशनकडील झाबुके, ठोसरे, आव्हाड तसेच शिक्रापुर पोलीस स्टेशन कडील सहायक फौजदार मुत्तनवार, पोलिस हवालदार अमोल चव्हाण यांनी केली आहे.