पुणे : बहुचर्चित जीबीएस रुग्णांची वाढती संख्या लक्षात आल्याने अखेर पुणे महापालिकेने दूषित पाणी आढळलेल्या १९ ‘आरओ प्लांट’ला टाळे ठोकत कडक कारवाईला सुरुवात केली. सिंहगड रोडवरील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव या भागात गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्यानंतर महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या होत्या. सुरुवातीला खासगी टँकर भरणा केंद्र व खासगी टँकरमधील पाण्याची तपासणी केल्यानंतर संबंधित पाण्यात कॉलीफॉर्म जिवाणू असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, संबंधितांना महापालिकेने लेखी पत्र पाठविले होते. तसेच, पाणी शुद्ध करून पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, महापालिकने २८ जानेवारीला ३० आरओ प्लांटमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यासंबंधीच्या अहवालात १९ आरओ प्लांटमधील पाण्याल ई-कोलाय व अन्य जिवाणू आढळले. या दूषित पाण्याचा पुरवठा संबंधित आरओ प्लांट चालकांकडून नागरिकांना केला जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत, संबंधित आरओ प्लांटवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागास दिले होते. आयुक्तांच्या आदेशानंतर अखेर पाणी पुरवठा विभागाची हालचाल सुरू झाली.
मंगळवारी पाणी पुरवठा विभागाने १९ आरओ प्लांटला टाळे ठोकण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे आरओ प्लांट व्यावसाय करणाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. मात्र, अजूनही खासगी टँकर, खासगी टँकर भरणा केंद्रांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारलेला नाही. पाणी शुद्ध करण्यासाठी केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केलेले आहे. मात्र, अजूनही खासगी टँकर, खासगी टँकर भरणा केंद्रांकडून महापालिकेस चांगला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.