पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड परिसरात (Pune Accident) भरदिवसा झालेल्या भीषण अपघातात 14 वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. प्रेम लोक पार्क परिसरात आकुर्डीहून चिंचवडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरएमसी ट्रकने सायकलस्वार मुलाला चिरडल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फारुक शकील तांबोळी (वय 14) हा नववीत शिक्षण घेणारा विद्यार्थी सायकलवरून जात असताना हा अपघात झाला. दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास प्रेम लोक पार्क परिसरातून एक आरएमसी ट्रक चाफेकर चौकाच्या दिशेने जात होता. त्याच वेळी सायकलवरून जाणाऱ्या फारुकला ट्रकने मागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मुलगा गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी मुलाला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये ट्रकने सायकलस्वाराला धडक दिल्याचा प्रकार दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी माहिती देताना पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित आरएमसी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून ट्रकही जप्त करण्यात आला आहे. चालकाला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे.







