पिंपरी-चिंचवड: शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकूण तीन जणांना अटक केली आहे. पथकाने आरोपींकडून ९६ किलो गांजा दोन चार चाकी वहाने आणि ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली आहे. या प्रकरणी आरोपी मनसाराम नूरजी धानका, संजय पांडुरंग मोहिते याच्यासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून दोन चार चाकी वाहनांद्वारे गांजाची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना महितीदाराकडून मिळाली होती. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड हे पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांच्यासोबत गस्त घालत होते. त्यावेळी पुणे- नाशिक महामार्गावरील रोहकल फाटा या ठिकाणी त्यांनी नाकाबंदी करून दोन्ही वाहने ताब्यात घेतली. यावेळी एकूण तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या समोर वाहन तपासणी झाल्यानंतर दोन्ही वाहनामध्ये सहा पोते आढळून आले. पोत्यांची तपासणी केली असता त्यात ९६ किलो २०४ ग्रॅम गांजा आढळून आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी, संजय पांडुरंग मोहिते, मनसाराम नूरजी धानका यांच्यासह एका महिलेला अटक केली आहे. या पूर्वीच संजय मोहिते याच्यावर कामशेत आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.