संदीप बोडके
पुणे, ता. 6: दफ्तर तपासणीमध्ये दिरंगाई व कामात अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवून लोणावळा (ता. मावळ) येथील परिरक्षक भूमापक विनायक वाघचौरे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर भूमापकाच्या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी उपअधीक्षक पल्लवी पाटील पिंगळे यांची असल्याने त्यांचीही विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती भूमी अभिलेख पुणे प्रदेशचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी “पुणे प्राईम न्यूज” ला दिली आहे. तर परिरक्षक भूमापकाचे निलंबन व उपअधीक्षकांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याने भूमी अभिलेख पुणे विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मोजणीची प्रकरणे विना कार्यवाही निकाली काढणे, महिन्यांहून अधिक वेळ खरेदी नोंदी व वारस नोंदी प्रलंबित ठेवणे. वाघचौरे यांच्याकडील अनेक प्रकरणात वर्ष उलटून गेले तरी काहीच कार्यवाही होत नाही, अशा तक्रारी जमाबंदी आयुक्त कार्यालय, उपसंचालक भूमी अभिलेख पुणे व जिल्हा अधीक्षक कार्यालयात प्राप्त होत्या. त्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या पथकास वाघचौरे यांच्या कार्याविवरणात दिरंगाई व अनियमतता दिसून आल्याने वरील कारवाई करण्याचे आदेश उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी पारित केले आहेत. त्यामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांशी अवार्च्य भाषेत बोलणे एका परिरक्षण भूमापकाच्या चांगलेच अंगलट आले आहे.
दरम्यान, परिरक्षक भूमापक वाघचौरे यांच्या कामाचा आढावा घेण्याची जबाबदारी ही उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाची असते. त्यामुळे मावळच्या उप अधिक्षक पल्लवी पाटील पिंगळे यांचीही विभागीय चौकशी करण्याचे आदेश उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी दिले आहेत. या निर्णयांचे मावळ तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे. तर दोन अधिकाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई झाल्यामुळे पुणे भूमिअभिलेख विभागातील कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महसूलमंत्री यांनी भूमिअभिलेख कार्यालयाचे वाभाडे काढल्याने आता तरी कारभारात सुधारणा होणार का?
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागरिकांनी मोजणी कार्यालयाच्या कामाबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. यामुळे भूमिअभिलेख कार्यालयाची प्रतिमा मलीन होत असल्याने, महसूलमंत्री बावनकुळे यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. आणि भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत पारदर्शक कामकाज करण्याबाबत कडक सूचना दिल्या आहेत. तसेच काही अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे भूमिअभिलेख कार्यालयातील अधिका-यांच्या कारभारात आता तरी सुधारणा होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विनायक वाघचौरे यांच्याकडील अनेक प्रकरणात वर्ष उलटून गेले तरी काहीच कार्यवाही होत नाही, अशा तक्रारी होत्या. विलंबामुळे लाचखोरीचेही आरोप होत होते. या तक्रारी लक्षात घेऊन जमाबंदी आयुक्त कार्यालयाने कार्यालयीन अधीक्षकांमार्फत वाघचौरे यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी केली. या तपासणीत त्यांच्या कार्यालयातील अनेक अर्ज 250 दिवस, 300 दिवस, काही तर 400 दिवसांपासून थकीत असल्याचे आढळून आले. तर काही अर्जाबाबत फाईल आढळत नसल्याचे शेरे दिल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारांमुळे खात्याची प्रतिमा मलिन होत असल्याने संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच परिरक्षक भूमापक वाघचौरे यांच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी उपअधिक्षकाची असते. या तपासणीत पल्लवी पाटील- पिंगळे यांचेही दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचीही विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.
राजेंद्र गोळे (उपसंचालक – भूमी अभिलेख पुणे प्रदेश)
मोजणीच्या प्रकरणामध्ये सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी कार्यालयाच्या बाहेर तासांतास ताटकळत ठेवण्याचा प्रकार सुरु होता. तर व्हीआयपी लोकांना थेट केबिनमध्ये प्रवेश देत उठबस करत पाहुणचार केला जातो. संबंधित उपअधीक्षक शिष्ट असून नागरिकांशी बोलताना अर्वाच्च भाषा वापरीत आहेत. मावळ भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार अनियमित असून अनेक नियमबाह्य कामे झालेली आहेत. तर कायदेशीर अधिकृत कामांना मुद्दामहून उशीर केला जातो. त्यामुळे संबंधित कार्यालयाबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. एवढेच नाहीत तर अति तातडीच्या मोजणी प्रकरणातही प्रत्यक्ष मोजणी करायलाही विलंबाची खुटी मारत आहेत.
शांताराम कदम (माजी उपसभापती – मावळ पंचायत समिती)