लोणी काळभोर, ता.14 : बेकायदेशीर रित्या अफूच्या शेतीचा पर्दापाश करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आळंदी म्हातोबाची (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता.14) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकून शेतकरी महिलेला अटक केली आहे.
एका 45 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रदीप क्षीरसागर यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप क्षीरसागर हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दहशतवादी विरोधी पथकात काम करतात. क्षीरसागर हे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कर्तव्य बजावत असताना, आळंदी म्हातोबाची येथील डोंगराच्या पायथ्याला एक महिला अफूची शेती करीत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, मंगल जवळकर यांच्या शेतामध्ये 66 अफूची झाडे आढळून आली. त्याचे वजन चार किलो असून त्याची बाजारामध्ये अंदाजे 40 हजार रुपये किंमत आहे. पोलिसांकडून या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ आणि मानसोपचार विषयक पदार्थ कायदा, 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, खत टाकल्यानंतर शेतात खसखसची झाडे उगवून आली आहेत. ती खसखस असल्याने ठेवली होती. पण हा अफू नावाचा अंमली पदार्थ आहे. याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. असे आरोपी महिलेने सांगितले आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलिस हवालदार रामहरी वणवे, गणेश सातपुते, प्रदीप क्षीरसागर, पोलिस अंमलदार शैलेश कुदळे, अक्षय कटके व महिला पोलिस वनिता यादव, वैशाली निकंबे यांच्या पथकाने केली आहे.