पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम मुलीला द्यावी, असा आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी दिला आहे.
संजू भागवत निकुंभ (वय-३१, रा. आंबेगाव खुर्द) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ६ ऑगस्ट २०१७ रोजी आंबेगावमध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणी ११ वर्षीय मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनेच्या दिवशी मुलगी ही निकुंभच्या दोन वर्षाच्या मुलीला खेळवत होती. त्यावेळी निकुंभ मुलीच्या घरात घुसला. त्याने तिच्याबरोबर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने आरडाओरड केल्याने तो तिथून निघून गेला. त्यापूर्वीही चार ते पाच वेळा त्याने मुलीवर अत्याचार केला होता. हा प्रकार कुणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
आरोपीवर पोलिसांनी २०१८-२०१९ दरम्यान दोषारोपपत्र दाखल केले होते. २०२१ मध्ये खटल्याला सुरुवात झाली होती. सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी या खटल्यात चार साक्षीदार तपासले. यामध्ये मुलगी आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली.