महेंद्र शिंदे
खेड-शिवापूर (पुणे) : चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सूटल्याने ट्रकने चार वाहनांना पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-सातारा रस्त्यावर वेळू (ता.भोर) येथे शुक्रवारी (दि. ७) दुपारी झाला. मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एक ट्रक पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ससेवाड़ी उड्डाण पुलावरून खाली उतरत असताना ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यावेळी या ट्रकची दोन दुचाकी, एक मोटारगाडी आणि एका टँकरला पाठीमागून धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन जण जखमी झाले आहेत. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
अपघाताची माहिती मिळताच राजगड पोलिस, महामार्ग पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अपघातातील वाहने रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.