लोणी काळभोर, ता. 14 : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडाशिक्षक निखिल जाधव यांनी राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. तसेच त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे जाधव सरांचे शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
7 वी नॅशनल मास्टर गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे राऊलकेला (राज्य -ओडीसा) येथील बिरसा मुंडा अँथलेटिक स्टेडियम मध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा पार नुकत्याच पडल्या. या स्पर्धेतील भालाफेक क्रीडा प्रकारात निखिल जाधव यांनी सुवर्ण पदक मिळविले. तर याच स्पर्धेतील थाळीफेक प्रकारात रौप्य पदक पटकावून दुहेरी कामगिरी केली आहे.
निखिल जाधव यांची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निखिल जाधव यांनी भालाफेक व थाळीफेक या खेळांमध्ये सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली. एक क्रीडाशिक्षक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळून जर सुवर्ण पदक मिळवत असेल तर विद्यार्थ्यांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जाधव यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होते आहे.
दरम्यान, क्रीडा शिक्षक निखिल जाधव यांचा रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर सर, संचालिका मंदाकिनी काळभोर यांच्याहस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या मिनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे, दीपक शितोळे, विकास धुमाळ, अश्विन मनगूतकर, शिवराज साने, संदीप शिंदे, धनंजय मदने, महेंद्र बाजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना, सहकारी मित्रांना, आदर्श व्यक्तींना व माझ्या रेनबो स्कूलला हा विजय समर्पित करतो. यशामागे कधीही रहस्य वगैरे काही नसते. योग्य नियोजन, प्रचंड कष्ट, सातत्याने पाठपुरावा आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती… यातून विजय नक्की साध्य करता येतो.
निखिल जाधव (सुवर्ण पदक विजेता)