योगेश मारणे
न्हावरे (शिरूर): पोलिसांकडून तातडीने मदत मिळवण्यासाठी नागरिकांनी ११२ क्रमांकाचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले. शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस वार्षिक निरीक्षण पाहणी कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील पोलीस पाटील, महिला दक्षता कमिटी, ज्येष्ठ नागरिक व पत्रकार यांच्याशी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले की, शिरूर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र मोठे आहे. तालुक्यातील नागरिकांच्या मागणीवरून शिरूर शहर व शिरूर ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठवण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले. यावेळी देशमुख यांनी शिरूर शहरामधील निर्भया पथकाचे कौतुक केले. तसेच शहरातील निर्भया पथकाची कामगिरी चांगली आहे असेही आवर्जून सांगितले.
“टाकळी हाजी येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन”…….
शिरूर तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे पोलिसांचे कार्यक्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी शिरुरच्या बेट भागात टाकळी हाजी येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ‘पुणे प्राईम’ला दिली.