लोणी काळभोर : खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, अॅट्रॉसिटी, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे, विनयभंग, पोक्सो, धमकी देणे व गावठी हातभट्टी तयार करणे असे संघटित गुन्हेगारी करून लोणी काळभोर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सोन्या घायाळसह त्याच्या 5 साथीदारांवर मोका कारवाई करण्यात आली आहे. हे आदेश पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.
सोन्या ऊर्फ निखील घायाळ (वय 32, रा. लोणी स्टेशन कदमवाकवस्ती, ता.हवेली) श्रीकांत मल्लीकार्जुन मेमाणे (वय-२६). गणेश रावसाहेब गोडसे (वय-२५), अविनाश महादेव कामठे (वय-२५) अशी मोका लागलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपी ओंकार धनंजय काळभोर (रा. लोणी काळभोर, ता.हवेली) व रोहित अनिल चौधरी (रा.सोरतापवाडी, ता.हवेली) यांना लोणी काळभोर पोलिसांनी आज मंगळवारी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वडाळे वस्ती परिसरात सोमवारी (ता. 23 डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सोन्या उर्फ नंदू घायाळ व त्याच्या साथीदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक केली होती.
दरम्यान, सोन्या ऊर्फ निखील घायाळ हा लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून सध्या तडीपार आहे. त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. मागील दहा वर्षात टोळीने अनेक गंभीर गुन्हे करून धुमाकूळ घातला होता. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होती.
गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी मोका चा प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील यांच्याकडे पाठविला होता. मनोज पाटील यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आरोपींवर गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२).३ (४) मंजूर केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलिस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलिस हवालदार गणेश सातपुते, तेज भोसले, प्रशांत नरसाळे, मल्हारी ढमढेरे, मंगेश नानापूरे व योगिता भोसुरे यांच्या पथकाने केली आहे.