न्हावरे,(पुणे)ता.८: रांजणगाव सांडस (ता.शिरूर) येथून एका अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मुलीच्या आईने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला रांजणगाव सांडस येथील राधेवाडी रोड जवळ मुलीसह एका कोपीमध्ये राहत होत्या. त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, 2 ते 3 मार्च दरम्यान अल्पवयीन मुलीची आई कामावर गेली असता एका अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेले. अशी तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
संबंधित मुलीने पिवळ्या रंगाचा ड्रेस, पांढऱ्या रंगाची पँट, पांढऱ्या रंगाची ओढणी, कानात बेंन्टेक्स पांढऱ्या रिंगा, उजव्या हाताच्या अंगठ्यावर इंग्रजीत ‘व्ही’असे गोंदलेले, पायात काळ्या कलरची साधी चप्पल, रंगाने सावळी, बांधा सडपातळ, उंची 5 फुट, नाक सरळ, केस काळे लांब, सोबत रेडमी कंपनीचा मोबाईल अशा वर्णनाची मुलगी कोणाला आढळून आल्यास शिरूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.