पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) कॅम्पसमध्ये छेडछाडीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री मराठी भाषा विभागाजवळ एका पुरूषाने तीन विद्यार्थिनींन समोर हस्तमैथुन केल्याची लज्जास्पद माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, या घटनेची माहिती विद्यापीठ अधिकाऱ्यांना देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. न्याय आणि गुन्हेगारावर कारवाईची मागणी करत विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारतीबाहेर निदर्शने करत आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, दरम्यान, विद्यार्थी कॅम्पसमध्ये चांगल्या सुरक्षा उपाययोजनांची मागणी करत आहेत. विद्यापीठ प्रशासन त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, विद्यार्थिनींनी कुलगुरूंची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला असता, रात्री उशीरा ९ वाजेपर्यंत मुली तिकडे काय करत होत्या. असा प्रतिप्रश्न कुलगुरूंनी विद्यार्थिनींना केला.
विद्यापीठ प्रशासनावर टीका
या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही म्हणून विद्यापीठ प्रशासनावर टीका होत आहे. कॅम्पसमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने पुरेसे उपाय केले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलनात सामील होऊन विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून घडलेल्या प्रकारचा निषेध करत आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी आणि कॅम्पसमध्ये त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यापीठ प्रशासन जो पर्यंत कोणतेही पाऊल उचलत नाही. तोपर्यंत लेक्चर न जाता आंदोलन करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हंटले आहे.