यवत(पुणे): भांडगाव गावच्या हद्दीत प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. लक्ष्मी एंटरप्राइजेस असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (१ मार्च) ला विजेच्या मीटर मध्ये शॉटसर्किट झाल्याने घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी भांडगाव गावाच्या हद्दीतील लक्ष्मी एंटरप्राइजेस या कंपनीच्या गोडावुन बाहेर असलेल्या विजेच्या मिटरमध्ये अचानक शॉटसर्किट होऊन आग लागली. आग लागल्याने कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात कंपनीचे प्लास्टीक मोल्डींग नर्सरी, झाडांचे ट्रे बनविण्यासाठी लागणारा तयार माल, कच्चा माल, तसेच ट्रे बनविण्यासाठी लागणारी मशीन, कॉम्प्रसर, ट्रे बनविण्यासाठी लागणाऱ्या ५ डाय, चिलर मशीन यांसह इतर साहीत्य जळून खाक झाले आहे. यामुळे सुमारे ३५ लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद कंपनीचे गणेश उमेश पारगे यांनी यवत पोलिस ठाण्यात दिली असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने कोणावरही संशय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ही घटना सकाळच्या वेळेत घडल्यामुळे सुदैवाने कोणतेही जीवित हानी झालेली नाही. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत.