लोणी काळभोर: भाषा म्हणजे बोली, हस्तलिखित किंवा लिखित चिन्हांची एक प्रणाली असते. या प्रणालीद्वारे मानव आपले विचार, भावना आणि अनुभव व्यक्त करतात. भाषा ही संकेतव्यवस्था असते. यामध्ये हावभाव, कृती, ध्वनी यांचा समावेश होतो. आपली मातृभाषा असलेली मराठी भाषा ही भारतातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे. मराठी भाषेचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेसाठी दिलेले योगदान खूप महत्वाचे असून अनेकांना प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गवळी यांनी केले आहे.
कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात मराठी राजभाषा गौरवदिन लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गुरुवारी (ता.27) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन प्राचार्य सीताराम गवळी यांनी केले. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी शाहीर महेश खुळपे होते. यावेळी प्राचार्या पौर्णिमा शेवाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज तसेच शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्था माता – सुशिलादेवी साळुंखे व श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी महाराष्ट्राची अस्मिता जोपासणारे मराठमोळे नृत्य सादर केले. यासाठी शिक्षिका प्रिती कदम यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले.
दरम्यान, शाळेचे माजी विद्यार्थी महेश खुळपे यांनी आपल्या सुंदर आवाजात लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी | जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी | एवढ्या जगात माय मानतो मराठी। हे महाराष्ट्र गीत गायले. व काही काव्यपंक्ती दमदार आवाजाने सादर केल्याने विद्यार्थी आनंदित झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा काळभोर व रुपाली रायपुरे यांनी केले. तर आभार अश्विनी हरपले यांनी मानले.