पुणे : मोबाईल दुकानातून सेल्स एक्झीक्युटीव्हने 4 लाखांहून अधिक मोबाईलची परस्पर विक्री करून अपहार केल्याची घटना घडली होती. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सेल्स एक्झीक्युटीव्हला अटक केली होती. आता या गुन्ह्यातील चोरीचा माल घेणाऱ्या दुकानदारालाही पोलिसांनी गुरुवारी (ता.16) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या दोन झाली आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार झाला आहे.
श्रीपाल नेमिचंद चोरिया (वय 43 रा. इशा पर्ल सोसायटी, डी विग, फ्लॅट नं. 1001, कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सेल्स एक्झीक्युटीव्हचे नाव आहे. तर पोलिसांनी आता चोरीचा माल घेणाऱ्या मोबाईल दुकानदार मादाराम चंदाराम सरगरा (वय-34 रा. घर नं. 03, सेन नं. 02, टिळेकर नगर, महसोबा मंदीराजवळ, कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मोबाईल दुकानाचे मालक विपकमल गुरमित सेहगल (वय 48, रा. टी-13 फ्लॅट नं. 002, रहेजा विस्टा प्रिमियर, मोहम्मदवाडी, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विपकमल सेहगल हे एक व्यावसायिक असून त्यांचे कॅम्प परिसरात मोबाईल अॅण्ड अॅक्सेसरिज डिस्ट्रीब्यूटर्स नावाने दुकान आहे. या दुकानातून पुणे शहर व महाराष्ट्रातील विविध शहरांत मोबाईल फोन व अॅक्सेसरीजचे वितरण केले जाते. सेहगल यांच्या दुकानात 17 जण काम करतात. तर आरोपी श्रीपाल चोरिया हा त्यांच्याकडे सेल्स एक्झीक्युटीव्ह म्हणून काम करीत होता.
दरम्यान, आरोपी श्रीपाल चोरिया याने वेगवेगळ्या डिलर्सकडून ऑनलाईन अथवा रोख स्वरुपात पैसे स्वतःकडे घेतले. तसेच काही मोबाईल हँडसेट परस्पर मार्केटमध्ये विकले. आरोपीने मोबाईल अॅक्सेसरीज, इतर इलेक्ट्रॉनिक वास्तू, फिचर फोनपैकी काही साहित्य डिलर्सकडून घेऊन त्याच्याकडेच ठेवले किंवा मार्केटमध्ये इतरत्र त्याची विक्री केली. आरोपी श्रीपाल चोरिया याने 4 लाख 22 हजार 985 रुपयांचा माल गायब केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सेहगल यांनी आरोपी श्रीपाल चोरिया याच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी श्रीपाल चोरिया याला अटक केली होती. अटक केल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आरोपी श्रीपाल चोरिया याने दुकानातून अफरातफर केलेला माल हा मादाराम सरगरा व बाबूलाल चौधरी यांना विकल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मादाराम सरगरा याला अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील आरोपी बाबूलाल तोताराम चौधरी (वय 30, रा. सैरवनाच मंदीर स.नं. 70 राम नं. 10 कोंढवा, खु. पुणे.) हा फरार झाला आहे. आरोपीच्या मागावर पोलीस आहेत. पुढील तपास बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ करीत आहेत.