माळेगाव: जागा व आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादामुळे दोन कुटुंबांत मारामारी झाली असून, चुलत सासऱ्याने सुनेवर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये सून गंभीर जखमी झाली. या भांडणात दीड लाखाचे सोन्याचे गंठण तोडून नेले असून, परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने अकरा जणांविरुद्ध माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
समिना अन्वर मुंढे (रा. मुंढेवस्ती, माळेगाव बु., ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताजुद्दिन इसाक मुंढे, सलीम रज्जाक मुंढे, अल्ताफ रज्जाक मुंढे, मुमताज रज्जाक मुंढे (सर्व रा. मुंढेवस्ती, माळेगाव बु., ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादींच्या सासऱ्याने एकत्रित कुटुंब असताना जागा खरेदी केली होती. ही जागा आरोपींनी परस्पर विकली होती. या जागेच्या पैशाच्या वादातून फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली असून, चुलत सासरा ताजुद्दिन मुंढे याने कोयत्याने डाव्या हातावर वार करून जखमी केले आहे. तसेच फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड लाखाचे सोन्याचे गंठण इतर एका आरोपीने तोडून नेले आहे. गुन्ह्याचा तपास हवालदार अमर थोरात करीत आहेत.
दुसरीकडे ताजुद्दिन इसाक मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबूलाल इसाक मुंढे, अन्वर रफिक मुंढे, फरजाना बाबूलाल मुंढे, लैला रफिक मुंढे, रियाज रफिक मुंढे, इरफान बाबूलाल मुंढे (सर्व रा. मुंढेवस्ती, माळेगाव बु., ता. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे घरासमोरील जागेत जनावरांचा चारा लावून घेत असताना तुम्ही आमच्या जागेत चारा का ठेवता, असे म्हणून किरकोळ वाद झाला. संध्याकाळी पुन्हा वरील आरोपींनी घरात घुसून मारहाण केली. या मारहाणीत तोंडावर ग्लास लागल्याने फिर्यादी जखमी झाले आहेत. या घटनेचा तपास हवालदार सादिक सय्यद करीत आहेत.