लोणी काळभोर, (पुणे): येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत दत्तात्रय काळभोर यांची सोमवारी (ता. 24) बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वीच्या सरपंच सविता गीताराम लांडगे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे वाघोली येथील अध्यासी अधिकारी तथा मंडल अधिकारी अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.
सरपंच पदासाठी भरत काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने मंडल अधिकारी अशोक शिंदे यांनी भरत काळभोर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. भरत काळभोर यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या अतिषबाजी करीत मोठा जल्लोष करण्यात आला.
यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी उपसभापती सनी काळभोर व मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच भरत काळभोर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतिचे ग्रामविकास अधिकारी एस.एन.गवारी यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
यावेळी साधना सहकारी बॅंकेचे सुभाष काशिनाथ काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर, माजी सरपंच शरद काळभोर, भोलेनाथ शेलार, योगेश काळभोर, माधुरी काळभोर, उपसरपंच रतन वाळके, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, संगीता काळभोर, सदस्य गणेश कांबळे, नागेश काळभोर, सामाजिक कार्यकर्ते अमित काळभोर, सागर काळभोर, अतुल काळभोर, तसेच ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच भरत काळभोर म्हणाले, “लोणी काळभोर गावच्या उर्वरित विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. लोणी काळभोर गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे.”