लोणी काळभोर, ता. 26 : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील राजलक्ष्मी लॉन्स समोर शुक्रवारी (ता. 21) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अशोक तुकाराम शिंदे (वय 26, रा. यवत साळोबा वस्ती ता. दौंड जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी अशोकचे वडील तुकाराम शिंदे (वय, 49 रा. ता. दौंड जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकवरील अज्ञात चालकावर भारतीय न्याय संहिता कलम 281,106 (2), 125 (ब), मोटार वाहन कायदा 134, 184,119/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी चालक हा ट्रक घेऊन पुणे सोलापूर महामार्गावरून चालला होता. पुण्याकडून सोलापुरच्या दिशेने जात असताना, ट्रक चालकाने लोणी काळभोर येथील राजलक्ष्मी लॉन्ससमोर एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर चालक अपघातातील जखमीला मदत अथवा पोलिसांना या घटनेची माहिती न देताच पळून गेला. या अपघातात अशोक शिंदे हे गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस हवालदार केतन धेंडे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
अज्ञात ट्रक चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवुन मोटार सायकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात अशोक शिंदे यांना गंभीर जखमी करून, त्याच्या मृत्युस कारणीभुत ठरला आहे. अशी तक्रार तुकाराम शिंदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.