पुणे : इंदापूर तहसील कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याची घटना समोर आली आहे. इंदापूर येथील तहसील कार्यालयात केलेल्या अर्जावर तहसीलदारांची सही घेण्यासाठी एका महिला कर्मचाऱ्याने २५ हजारांची लाच घेतल्याचे प्रकरण उघड झाले आहे. कावेरी विजय खाडे (वय ४८) असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत महिला कर्मचाऱ्या विरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, इंदापूर तहसील कार्यालयात भ्रष्टाचार प्रकरणी कावेरी विजय खाडे (वय ४८) या महिला कर्मचाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खाडे यांना अटक करण्यात आली आहे. लाच मागीतल्याबबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. इंदापूर परिसरातील भांडगाव येथे तक्रारादाच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. या जमिनीच्या परिसरात रस्ता तयार करण्यासाठी परवानागी मिळावी, यासाठी तक्रारदाराने इंदापूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता.
दरम्यान, या अर्जावर सुनावणी झाली. मात्र अंतिम आदेशावर तहसीलदारांची सही घेण्यासाटीठी तहसील कार्यालयातील महसूल सहायक कावेरी खाडे हिने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता महिलेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई केली आहे.
कावेरी खाडेने फिर्यातदाराला २५ हजार लाचेची रक्कम शुक्रवारी तहसील कार्यालयात घेऊन यायला सांगितले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कर्मचारी खाडेला फिर्यातदाराकडून २५ हजारांची लाच घेताना पकडले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या (दूरध्वनी- ०२०-२६१२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३) वर तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.