लोणी काळभोर: पुणे-सोलापूर महामार्गाच्या रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावरील दिव्यांच्या खांबावर बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जाहिरातींसाठी लागलेले फ्लेक्स रस्त्यावर पडल्याने, वाहनचालकांना विशेषतः दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. अनधिकृत फ्लेक्सच्या सूळसुळाटामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित जाहिरातदार व फ्लेक्स छापणाऱ्यांवर प्रशासन कारवाई कधी करणार? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शेवाळवाडी, मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊरफाटा, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ व उरुळी कांचन या ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीत रस्त्यांमधील दुभाजकांवर नागरिकांच्या सोयीसाठी दिवे लावले आहेत. ग्रामपंचायतींनी उभारलेल्या या दिव्यांच्या खांबावर जाहिरात करता येत नसतानाही पूर्व हवेलीमधील अनेकजण फ्लेक्स लावून आपापल्या जाहिराती करत आहेत.
दरम्यान, या महामार्गावरून गाडी चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. कारण हे सर्व फ्लेक्स धोकादायकरित्या असून फ्लेक्समुळे रस्त्याच्या पलीकडील गाडी दिसत नाही. वाहन चालकांना गाडी वळविताना फ्लेक्स अडवा येत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातून एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बेकायदा फ्लेक्स लावणाऱ्यांविरोधात हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पीएमआरडीए कधी कारवाई करणार? याकडे संपूर्ण पूर्व हवेलीमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पथदिव्यांच्या खांबावर फ्लेक्स वाहनचालकांना गाडी चालविताना आडवे येत आहेत. या मार्गावरून गाडी चालवणाऱ्या चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने खबरदारी घ्यावी. जाहिरातदार व फ्लेक्स छापणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
– सचिन तुपे (माजी सरपंच, कुंजीरवाडी, ता. हवेली)
पथदिव्यांच्या खांबावर अनधिकृत फ्लेक्स लावल्यामुळे वाहनचालकांना गाडी चालविताना अडथळे येत आहेत. महामार्गावर ज्यांनी फ्लेक्स लावले आहेत, त्यांनी त्वरित फ्लेक्स काढून घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल.
– राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)