पुणे: राज्य शासनाकडून काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेवर अप्पर आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी (दि. ६) प्रदीप चंद्रन यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एप्रिल महिन्यात बदली केली होती. तेव्हापासून ही दोन्ही पदे रिक्त होती. अखेर पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी एम. जे. प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती केली आहे, त्यामुळे पुणे महापालिकेला तब्बल ११ महिन्यानंतर अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत. अतिरिक्त आयुक्ताची नियुक्ती करण्यात आल्यामुळे आता महापालिकेच्या कामाला वेग येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी एकाच जिल्ह्यात तीन वर्षांपासून अधिक काळ काम करणाऱ्या प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्यात आली. राज्य सरकारने पुणे महापालिका आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्त या आयएएस अधिकाऱ्यांसह उपायुक्त दर्जाच्या पाच अधिकाऱ्यांची बदली केली. बदली झालेल्या या अधिकाऱ्यांच्या जागेवर अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार महापालिका आयुक्त पदावर डॉ. राजेंद्र भोसले यांची, तर अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त झालेल्या तीन जागापैकी केवळ एका जागेवर पृथ्वीराज बी. पी. यांची नेमणूक झाली होती. परंतु उर्वरित दोन अतिरिक्त आयुक्त जागा रिक्तच ठेवण्यात आल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जूनमध्ये संपली. त्यानंतर उपायुक्तांच्या रिक्त जागांवर शासनातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. साधारण त्याचवेळी अतिरिक्त आयुक्त पदाच्या जागाही भरण्यात येतील, अशी अपेक्षा होती. परंतु, विधानसभा निवडणुका होऊनही नवीन सरकार स्थापन झाले आहे. तरीही अतिरिक्त आयुक्तपदाच्या दोन्ही जागा रिक्तच ठेवल्या आहेत. त्यामुळे गेल्या ११ महिन्यांपासून अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडेच सर्वच विभागांचा कारभार आहे. त्यामुळे एका अतिरिक्त आयुक्तांना कारभार संभाळताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
त्यानंतर राज्य सरकारच्या महसुल खात्याने महेश पाटील यांची पुणे महापालिकेच्या अप्पर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईतील उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) एम. जे. प्रदीप चंद्रन यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी यापुर्वी भंडारा जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.