थेऊर, ता. 16 : विविध रंगी फुलांनी सजलेले अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे संकष्टी चतुर्थीला श्री. चिंतामणी मंदिरात बुधवारी (ता. 16) भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
चंदनाचा लेप लावलेल्या स्वयंभू मुर्तीला हारतुऱ्यांची सजावट, धुप अत्तराचा दरवळत असलेला सुंगध यातून ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने पहाटेपासूनच भाविकांनी चिंतामणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
पहाटे पुजारी आगलावे बंधु यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त केशव विद्वांस उपस्थित होते. देवस्थान तर्फे मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आले होते. दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संकष्टीनिमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल्स ग्राहकांनी गजबजले होते. दर्शन रांगामुळे मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
उष्णतेमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर परिसरात जागोजागी मोठे कूलर लावण्यात आले होते. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि तर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे श्रेष्ठ कार्य केले. थेऊर परिसरात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांच्या साथीने ह.भ. प. तुपे महाराज, हडपसर यांचे सुभाष्य कीर्तन होणार आहे. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात येणार असून त्यानंतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून होते.