पिंपरी : दहावीच्या परीक्षेला येताना एका मुलीने बुरखा घातला होता. त्यामुळे शाळेने त्या मुलीला दहावीच्या परीक्षेसाठी प्रवेश नाकारला. त्यामुळे पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्या मुलीला शनिवारी परीक्षेस बसू दिले. मात्र, सोमवारी होणाऱ्या परीक्षेस बसू देणार नाही, अशी भूमिका शाळेने घेतल्याचे मुलीच्या पालकांनी सांगितले.
बिजलीनगर, चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका मुलीला दहावीच्या परीक्षेकरिता निगडीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केंद्र आले आहे. शनिवारी सकाळी ती मुलगी परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली. मात्र तिने बुरखा घातला असल्याने शाळेने तिला वर्गात जाण्यासाठी मज्जाव केला. अखेर तिच्या पालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. निगडी पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर तिला परीक्षेला बसू देण्यात आले.