संदीप बोडके
पुणे: कोंढवा बुद्रुक येथील सातबारावर वारस नोंद प्रकरणी हवेलीतील एका तलाठ्यावर कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. वारस नोंदीचा फेरफार केला एका तलाठ्याने, मात्र गुन्हा दाखल झाला दुसऱ्याच तलाठ्यावर. या प्रकारामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
दाखल गुन्ह्याबद्दल हवेलीतील तलाठी व मंडल अधिकारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय तलाठ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे संबंधित गुन्ह्यामधून तलाठी यांचे नाव वगळण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केली आहे. २२ एप्रिलपर्यंत प्रस्तुतच्या गुन्ह्यामधून तलाठ्याचे नाव कमी न केल्यास पुणे जिल्ह्यातील तलाठी व मंडल अधिकारी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती तलाठी संघटनेनी दिली आहे.
कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे नंबर ६६/१ मधील वारस फेरफार नोंद ३८९१५ ही तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र “आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी” या म्हणीप्रमाणे संबंधित वारसनोंद ज्या तलाठी व मंडल अधिकाऱ्याने केली आहे, त्यांना सोडून दुसऱ्याच तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्याचा पराक्रम पोलीसांकडून करण्यात आल्याने वेगळाच ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
२०२२ मध्ये वारस नोंदीवरून देहू येथील प्रकरणात खोटे गुन्हे दाखल केल्यानंतर तलाठी संघटनेने आंदोलन केले होते. तसाच काहीसा प्रकार कोंढवा बुद्रुक येथील वारस नोंद प्रकरणात झाला आहे. त्यामुळे तलाठी संघटना आता काय भूमिका घेणार? तसेच शासन निर्देशानुसार ऑनलाईन वारस नोंद होत आहेत. याबाबत तलाठी व मंडल अधिकारी काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे.
कोंढवा बुद्रुक येथील ज्या वारस नोंदीवरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, ती वारस नोंद ज्या तलाठ्याने गावी दफ्तरी फेरफार नोंदीद्वारे घेतली आहे. त्यांची पदोन्नती होऊन ते दौंड तालुक्यात मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच वारस नोंद मंजूर करणारे मंडल अधिकारी सेवा निवृत्तीच्या वाटेवर आहेत. असे सर्वकाही असताना सद्यस्थितीत कोंढवा बुद्रुकचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा संबंधित प्रकरणात दुरान्वये संबध नसतानाही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलीसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.