पिंपरी चिंचवड : शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक करण्यात आल्याचे अनेक प्रकार हल्ली समोर येत आहेत. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही जणांना पुणे जिल्ह्यात आणून बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुण्यात समोर आलेल्या प्रकरणात सायबर पोलीसांनी शेअर मार्केटच्या नावाने नागरिकांना लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घालणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रोहीत पटाडीया, विशाल कदम आणि रमजान सदिक चौहान असे सायबर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आरोपींची नावे आहेत. तर मुख्य आरोपी सुरज खेडेकर हा अद्याप फरार असुन पोलीस त्याच्या मागावर आहेत.
लाखो रुपयांचा गंडा..
पोलिसांनी अटक केलेल्या या सर्व आरोपींनी पिंपरी चिंचवड शहरातील एका गुंतवणूकदाराला ६७ लाख ६९ हजार ९५० रुपये वेगवेगळ्या बँके अकाउंटमध्ये जमा करायला लावले. या माध्यमातून लाखो रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
शेअर मार्केटच्या नावाने लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी राजस्थानमधील नागोर गावातील व्यक्तींना पुणे जिल्ह्यात आणून, बनावट कागदपत्रांच्या द्वारे त्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पुढीलतपास पोलीस करत आहेत.