पिंपरी : जमिनीच्या वादातून मामा-भाच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. 16) सायंकाळी कान्हेवाडी खुर्द आणि साबळेवाडी फाटा येथे घडली असून सोमवारी (दि.17) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. भाचा गीताराम रघुनाथ प्रधान (वय 43, राजगुरुनगर खेड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मामा ज्ञानदेव बबन शिंदे, भागोजी दत्तू राजगुरव, संतोष आबाजी कौदरे, शंकर दगडू राजगुरू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जमिनीचे वाद आहेत. गीताराम हे कान्हेवाडी खुर्द येथे जात असताना त्यांना मामा ज्ञानदेव शिंदे हा दिसला. तू माझ्याविषयी लोकांना माझ्या खांडोळ्या करून जेलमध्ये जाईल असे का सांगतोस, असा गीताराम यांनी जाब विचारला. या कारणावरून ज्ञानदेव शिंदे यांनी गीताराम यांना मारहाण केली. लोखंडी सळईने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. गीताराम हे उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जात असताना साबळेवाडी फाटा येथे आरोपींनी पुन्हा गीताराम यांना मारहाण केली.
याप्रकरणी परस्पर विरोधात ज्ञानदेव बबन शिंदे (वय 62, रा. कान्हेवाडी खुर्द, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गीताराम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानदेव आणि आरोपी गीते हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. गितेश याने ज्ञानदेव यांना जमिनीच्या कारणावरून मारहाण करून जखमी केले.