लोणी काळभोर, ता.23 : कट मारल्याचा कारणावरून पीएमटी चालक व दुचाकीस्वार यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता.हवेली) परिसरात रविवारी (ता.23) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएमटी व दुचाकीस्वार दोघेही पुण्याकडून उरुळी कांचनच्या दिशेने चालले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना, पीएमटी चालकाच्या समोर अचानक एक व्यक्ती आल्याने चालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा पीएमटीचा दुचाकीला कट बसला. तेंव्हा दुचाकीस्वाराने पीएमटी गाडी थांबविली. त्यानंतर चालकाला शिवीगाळ करून खाली उतरविले.
दरम्यान, पीएमटी चालक व दुचाकीस्वार यांच्यात रस्त्यावरच हाणामारी झाली. यावेळी पीएमटीच्या वाहकाने हस्तक्षेप करून भांडणे सोडविली. यावेळी महामार्गावर थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. भांडणे मिटल्यानंतर दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले. तर या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला आहे.