पुणे ता. 26 : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून नसरापूर येथील बनेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. महाशिवरात्रीच्या आधी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची वर्क ऑर्डर काढून दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर येत्या चार मार्चपासून आपण आमरण उपोषणाला बसू असा गंभीर इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज पहाटेच बनेश्वर देवस्थान येथे दर्शन घेण्यासाठी खासदार सुळे पोहोचल्या होत्या. याठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रशासनाला थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बनेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी या रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे म्हणून ग्रामस्थांसह आपण स्वतः वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यासाठी पत्र व्यवहार केला आहे. अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सूचना देण्याबरोबरच निवेदने आणि ग्रामस्थांच्या सह्यांची पत्रेही वारंवार दिली आहेत.
वारंवार लक्षात आणून देऊनही प्रत्यक्ष आज महाशिवरात्री आली तरी देखील शासनाचे याकडे लक्ष जात नाही. अद्याप वर्क ऑर्डर सुध्दा काढली गेली नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून हा रस्ता तातडीने दुरुस्त केला नाही किंवा किमान वर्कऑर्डर काढली गेली नाही तर येत्या ४ मार्च पासून आपण स्वतः नाईलाजाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं खासदार सुप्रिया सूळे म्हणाला आहेत. अलीकडेच सुप्रिया सूळे यांनी याबाबत प्रशासनाला आणखी एक पत्र दिले होते, त्याची आठवण करून देत सुळे यांनी ट्विट देखील केले आहे.