संतोष पवार
इंदापूर(पुणे): लाडकी बहिण योजनेप्रमाणे निवडणुकीपूर्वी दिलेला कर्जमाफीचा शब्द खरा होणार का याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीत दिलेला शेतीच्या सरसकट कर्जमाफीचा शब्द मार्च अखेर पर्यंत तरी पूर्ण करावा व कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
राज्य विधीमंडळाच्या चालु अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होईल याविषयी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या खते, कीटकनाशके, अवजारे, इंधन, मजुरी यांचे दर वाढल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. परंतु मिळणारे उत्पन्न त्याहुन कमी असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. आधुनिक अन् भांडवली शेती करण्याच्या नादात शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहेत तर दुसरीकडे शेतीविषयक लागणाऱ्या साधनसामग्रीवर लादलेला जीवघेणा जीएसटी सारखा कर यामुळे शेतकरी वर्गाचे सगळे समिकरण बिघडले आहे.
शेतकऱ्यांना शेतामधुन मिळणारे उत्पन्न आणि करावा लागणारा उत्पादनखर्च याचा ताळमेळ लागत नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे विनाअट सर्वच शेतकऱ्यांना सरसकट चालू व थकित कर्जमाफी करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून जोर धरु लागली आहे.
“सरकारने शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाला हमीभाव जाहीर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतीविषयी नकारात्मक व उदासीनता तयार झाली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतीविषयक धोरणामध्ये बदल करून शेतीक्षेत्राला चालना देऊन शेतकऱ्यांचे शेतीविषयक मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे”.
– विजय गावडे ( शेतकरी, कळस ता . इंदापूर)