संतोष पवार / पळसदेव (पुणे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे.
सदरच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. सदरच्या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी आता 7 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी 7 डिसेंबर 2024 पर्यंत नियमित शुल्क, आठ डिसेंबर ते 15 डिसेंबर अखेर विलंबशुल्क, 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर पर्यंत अतिविलंब शुल्क आणि 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 अखेर अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2024 नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त अश्विनी भारुड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे.