लोणी काळभोर, ता. 6 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट (ता. हवेली) ते कासुर्डी टोलनाका (ता. दौंड) या दरम्यानच्या अतिक्रमणांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईची सुरवात कवडीपाट टोलनाक्यापासून झाली. या कारवाईस सुरूवात बुधवारी (ता.5) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झाली. मात्र ही अतिक्रमणांवरील कारवाई आज गुरुवारी (ता.6) थंड झाल्याचे दिसून येत आहे.
कवडीपाट टोलनाक्यावर 21 मीटर अंतरावरील अतिक्रमणाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. यावेळी पीएमआरडीएचे अधिकारी व स्थानिक नागरिक यांच्यामध्ये वादावादी झाली होती. परंतु, काही तोडगा निघत नसल्याने अखेर लोणी काळभोर पोलिसांना बोलविण्यात आले. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी अतिक्रमण विभागाचे अधिकारी व नंदकिशोर काळभोर, सुरेश काळभोर, अतुल काळभोर, आकाश काळभोर व स्थानिक नागरिकांशी चर्चा घडवून आणली.
दरम्यान, या चर्चेत 21 मीटर अंतरावरील अतिक्रमणाऐवजी एनएचआयच्या हद्दीतील 15 मीटर अंतरावरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला आहे. तसेच उर्वरित 6 मीटरवरची अतिक्रमणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नोटीस बजावून काढण्यात येणार आहेत. त्यानुसार यवत पर्यंत दोन्ही बाजूकडील 15 मीटरवरील अतिक्रमणे काढण्यास बुधवारीपासून (ता. 6) सुरवात झाली. त्यामुळे आजही कारवाई जोरदार होईल? अशी नागरिकांना आशा होती. प्रत्यक्षात तसे न घडता त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते यवत या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. यामध्ये हॉटेल, अनधिकृत टपऱ्या व दुकानांचा समावेश आहे. अतिक्रमणे निघणार म्हणून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र पीएमआरडीएची कारवाई सध्या थंडावल्याने रस्त्यावरील ही अतिक्रमणं करून थाटलेली दुकाने निघणार कि नाहीत? अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे या कारवाईकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.