यवत, (पुणे) : पाटस (ता. दौंड) येथील विशाल जुन्नर सहकारी पतपेढी शाखेत बनावट सोनेतारण ठेवून 5 जणांनी पतसंस्थेची तब्बल 7 लाख 81 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 5 जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर 2022 ते फेब्रुवारी 2024 या दरम्यान हा प्रकार घडला आहे.
परशुराम भुजंग शेळके (रा. बोरीपार्थी थोरातमळा, ता. दौंड), अंकुश शिवाजी सुरवसे (रा. बोरमलनाथ मंदिराजवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपाठीमागे, ता. दौंड), गणेश रघुनाथ शेंडगे (वय- 22 रा. केडगाव फाटा, दत्त मंदिरापाठीमागे, ता. दौंड), नीलेश अनिल शहाणे, व रोहित उमेश पळसकर (दोघे रा. पाटस ता. दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजय लक्ष्मण ढमाळ (वय 42, रा. उरुळी देवाची, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय ढमाळ हे पाटस येथील विशाल जुन्नर सहकारी पतपेढी शाखेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. परशुराम शेळके, अंकुश सुरवसे, गणेश शेंडगे यांनी या पतपेढीत एक सोनसाखळी गहाण ठेवली होती. त्याबदल्यात पतपेढीकडून त्यांना 7 लाख 81 हजार रुपये कर्ज देण्यात आले होते.
गहाण ठेवलेल्या सोन्याच्या साखळीचे मूल्यांकन नीलेश शहाणे, रोहीत पळसकर यांनी केले. त्यांच्याकडून पतपेढीला सोने खरे असल्याचा मूल्यांकन दाखलाही देण्यात आला. तीन वर्षे उलटूनही शेळके, सुरवसे आणि शेंडगे यांनी पतपेढीचे 7 लाख 81 हजार रुपये कर्ज फेडले नसल्याने सोनसाखळी पतपेढीकडून जप्त करण्यात आली.
दरम्यान, जप्त केलेली सोनसाखळी बनावट असल्याचे ढमाळ यांच्या लक्षात आले. त्यावरून पतपेढीची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत ढमाळ यांनी यवत पोलीस ठाण्यात वरील 5 जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख तपास करीत आहेत.