पुणे : अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट बघायला मिळाली होती. अशातच राहुल सोलापूरकर यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे, जे सद्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्यानंतर आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून सोलापूरकर यांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी; अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेबाबत राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर संबंध महाराष्ट्रातून सोलापूरकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. काही संघटनांकडून आक्रमक होत सोलापूरकर यांच्या घरावर चाल करण्यात आली होती. त्यानंतर वादग्रस्त विधानाबद्दल सोलापूरकरांनी माफी मागितली आहे.
नेमकं काय म्हणाले सोलापूरकर?
राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मण ठरतात, असं विधान केलं आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तोंडाला काळे फासण्याचा इशारा..
सचिन खरात म्हणाले की, मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात, असे अत्यंत निषेधार्ह विधान केलं आहे. पण, राहुल सोलापूरकर यांना मी सांगू इच्छितो की, जे वेद आहेत, त्याच्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले आहे आणि डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला राहुल सोलापूरकर यांनी काहीही शिकवू नये.
तसेच राज्य सरकारने राहुल सोलापूरकर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही सचिन खरात यांच्याकडून देण्यात आला आहे.