पुणे: न्हावरे(ता.शिरूर) येथे एका डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी न्हावरे येथील नाथ कृपा या हॉस्पिटलचा संचालक डॉ. रामहरी भुजंगराव लाड याला शिरूर न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम ३५४व कलम ३५४(अ) नुसार दोन वर्षांची शिक्षा व ३० हजार रुपये दंड किंवा दंड न भरल्यास एक महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, ९ऑगस्ट २०२० रोजी डॉक्टर रामहरी भुजंगराव लाड याच्या श्रीनाथ कृपा हॉस्पिटलमध्ये एक महिला रात्रीच्या वेळी उपचारासाठी गेली होती. त्या दरम्यान डॉक्टर रामहरी लाड याने त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केला. तसेच तिच्याशी अश्लील पद्धतीने वर्तणूक केली होती. त्यामुळे संबंधित महिलेने डॉक्टरच्या विरोधात शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रवीण खाणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे यांनी पुरावे व साक्षीदार न्यायालयात हजर केले. त्यानुसार शुक्रवारी (दि.२१) झालेल्या निकालाच्या अंतिम सुनावणी दरम्यान सरकारी वकिल माया क्षिरसागर यांनी डॉक्टर लाड याच्या विरोधात युक्तिवाद केला. तसेच त्या डॉक्टरला शिक्षा व्हावी अशी मागणी शिरूर न्यायालयाला केली होती. त्यानंतर शिरूर न्यायालयाने कथित डॉक्टर रामहरी भुजंगराव लाड याला दोन वर्षाची शिक्षा व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.