वानवडी(पुणे): पुण्यात एका धक्कादायक घटनेत कर्जाचे 24 हप्ते व्यवस्थित भरले परंतु एक हप्ता थकल्याने कर्जदाराच्या घरात घुसून मारहाण केल्याच्या आरोपाखाली दोन वसुली एजंटना अटक करण्यात आली आहे. ही घटना 27 मार्च रोजी पुण्यातील शांतीनगर परिसरात घडली. वानवडी पोलिसांनी या दोघा बाऊन्सरांना अटक करून कारवाई केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कर्जदाराने त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी बजाज फायनान्सकडून 7.73 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. इतर प्रोसिसिंग फी कट करुन 6 लाख 85 हजार रुपये देण्यात आले. त्यांना 18 हजार 70 रुपयांचा हप्ता ठरवण्यात आला होता. ते नियमितपणे त्यांचे ईएमआय भरत होते, परंतु त्याच्या पुतण्याच्या अपघातामुळे एक हफ्ता चुकला होता. आकाश पुरुषोत्तम सापा आणि ऋषिकेश नागन्नाथ चंदनशिवे या वसुली करणाऱ्या बाऊन्सरनी कर्जदाराकडे पैसे घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्यावर पिडीत आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार २७ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शांतीनगरमधील फिर्यादीच्या घरात घडला.
पोलिसांनी वसुली एजंटला केली अटक
पोलिसांनी दोन्ही वसुली एजंटना अटक केली आणि बजाज फायनान्सचे मॅनेजर हर्षद जिमन यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हि घटना वसुली एजंटांकडून होणाऱ्या छळाला अधोरेखित करते. अनेक पीडितांना या त्रासाला सामोरे जावे लागते. वसुली एजंटकडून होणाऱ्या कोणत्याही छळाची किंवा धमकीची तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी कर्जदारांना केले आहे. पोलिसांनी वसुली एजंटना देयके वसूल करण्यासाठी जबरदस्तीच्या पद्धती वापरण्याविरुद्ध इशारा दिला आहे.