पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाने काँग्रेसला मोठी आघाडी दिली होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा मतदारसंघ आपल्याकडे राखणार असं बोललं जात होतं. मात्र लोकसभेनंतर भाजपने केलेलं संघटनात्मक मोर्चे बांधणीच काम आणि त्या कामाच्या जोरावर हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यास यश मिळवलं आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा महाविकास आघाडीकडून रमेश बागवे तर महायुतीकडून सुनील कांबळे हे मैदानात होते. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत भाजपच्या सुनील कांबळे यांनी विजय मिळवला आहे.
2019 मध्ये सुनील कांबळे यांनी रमेश बागवे यांचा अवघ्या 5 हजार मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची नेहमीच निर्णय राहिला आहे. आणि तो सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी राहिल्याचं बघायला मिळालं आहे. त्यामुळे याच मुस्लिम मतदारांना मुख्यस्थानी ठेवून रमेश बागवे यांनी प्रचार प्रसार केला असल्याचे बघायला मिळालं होता. मुस्लिम मतदारांचे मत निर्णायक ठरण्याची शक्यता होती. मात्र तसं होताना दिसले नाही.
या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनील कांबळे आणि रमेश बागवे यांच्या खेरीस तब्बल 20 उमेदवार मैदानात होते. वंचित बहुजन आघाडीने देखील निलेश आल्हाट यांना पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिल्याने बहुजन मतांमध्ये काही प्रमाणात विभाजन झाल्याचं बघायला मिळालं. त्यांनी आठ हजार आठशे मतं घेतली.
सुनील कांबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे आणि योजना आधारावर प्रचार केला होता. तर बागवे यांनी दहा वर्षांपूर्वी आमदार आणि मंत्री म्हणून आणि त्यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून केलेली कामे मतदारांना सांगण्याचा प्रयत्न करताना ते बघायला मिळाले. आज मात्र सुनील कांबळे यांचा 10320 मतांनी विजय झाला आहे. त्यांना 76 हजार 32 मतं पडली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांना 65 हजार 700 मतं मिळाली आहेत.