लोणी काळभोर, ता. 26 : चेन्नई सुपर किंग्ज हा संघ आयपीएलमधील एक सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट संघ आहे. भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनीने या संघाचे नेतृत्व केले आहे. या संघाने 5 वेळा विजेतेपद पटकविले आहे. आणि याच संघाच्या साईड आर्म ट्रेनर पदी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील निलेश किसन शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे लोणी काळभोर येथील मुलगा सीएसके संघाचा एक महत्वाचा भाग असणार आहे. लोणी काळभोरकरांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे.
निलेश शिंदे यांचे प्राथमिक शिक्षक वाकवस्ती (कदमवाकवस्ती, ता. हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. निलेश चौथीच्या वर्गात शिकत असताना, त्यांचे वडील किसन शिंदे यांचे आकस्मित निधन झाले. वडिलांचे अचानक निधन झाल्याने दोन मुले व दोन मुलींची जबाबदारी आई रुक्मिणी यांच्यावर पडली. आईने न डगमगता काबाडकष्ट करून मुलांना चांगले शिक्षण दिले. निलेश शिंदे यांनी लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व जुनिअर कॉलेजमधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
निलेश यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. घरची परिस्थिती हलाखीची असतानादेखील त्यांनी अभ्यासासोबत खेळाची सांगड घातली. त्यांना प्रशिक्षक कालिदास काळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्याच तालमीत निलेश क्रिकेटचे धडे घेत गेले. त्याचबरोबर निखिल यांनी घराची आर्थिक घडी बसविण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. ते येवलेवाडी येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रिकेट कोच म्हणून सध्या कार्यरत आहेत. निलेश शिंदे हे विवाहित असून त्यांना एक अडीच वर्षाचा मुलगा आहे
निलेश यांनी काम करीत असताना खेळाची आवड जपली. पुढे भारतीय क्रिकेटर केदार जाधव यांना बॉलिंग केली. त्यानंतर महाराष्ट्र रणजी ट्रॉफी मध्ये खेळाडूंना सरावासाठी गोलंदाजी केली. यावेळी महाराष्ट्र रणजी व सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी त्यांची गोलंदाजी पहिली आणि गोलंदाजीची दखल घेऊन ऋतुराज गायकवाड याने चेन्नई सुपर किंगच्या संघासाठी साईड आर्म ट्रेनरसाठी शिफारस केली होती. या शिफारशीची दखल घेऊन सीएसकेसाठी निलेश शिंदे यांची निवड करण्यात आली असून ते बुधवारी (ता.26) संघामध्ये सहभागी होण्यासाठी चेन्नईकडे रवाना झाले आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी साईड आर्म ट्रेनर म्हणून निवड झाल्याने खूप आनंद झाला आहे. हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा आहे. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी संधी दिल्याने त्यांचे आभार मानतो. मला मिळालेल्या संधीचे सोने करणार आहे. याचा नक्कीच संघाला फायदा होईल. या सर्व यशाच्या पाठीमागे माझी आई व बहिणी, राणी यांचे खूप मोठे श्रेय आहे.
– निलेश शिंदे, सीएसके ट्रेनर
व्हिडिओ लिंक: https://www.youtube.com/watch?v=lnlF71p9z6M