लोणी काळभोर: हवेली तालुक्याच्या पुर्व भागातील बहुतांश गावांना सतावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मोठ्या प्रमाणांत वाढत असलेल्या नागरीकरणामुळे नागरी सुविधांवर येणारा ताण, महामार्गावर नेहमी होत असलेली वाहतुक कोंडी या समस्या सोडवण्यासाठी २३ नोव्हेंबर रोजी शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पुणे शहरालगत विखुरला गेलेला हा तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असूनही केवळ स्थानिक राजकीय नेत्यांचे आपापसांतील मतभेदांमुळे होणारे कुरघोडीचे राजकारण यामध्ये सर्वसामान्य भरडला जात आहे. हवेली तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र मुलभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे. गेली अनेक वर्षे सुरवातीला जेष्ठ नेते शरद पवार व नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व मानणाऱ्या या तालुक्यांत काही प्रश्न गेली अनेक वर्षे जैसे थे आहेत. गेल्या १३ वर्षांपासून शासनाकडून वेळोवेळी सुरू करण्याचे आश्वासन मिळून आजअखेर बंद असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना तसेच इतरही बहुतांश मुलभूत प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.
सध्या केंद्रात भाजपचे, तर राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) यांचे सरकार आहे. पूर्व हवेलीतील काही गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंटचे झाले, परंतु बहुतांश गावांकडे जाणारे रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी यांसारख्या मुलभूत सुविधांपासून जनता त्यावेळीही वंचित होती व आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर परिसर व थेऊर गाव आजही अनेक सोईसुविधांपासून वंचित आहे. तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय व थेऊर येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांना रस्त्यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजकारण्यांकडून फक्त आश्वासने मिळतात. परंतु, साध्य मात्र काहीच होत नाही. वेगवेगळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांनी “यशवंत प्रश्नी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, तो आहे त्या ठिकाणावर सुरू करणार” अशी घोषणा गेल्या काही वर्षांत अनेकवेळा केली. मात्र, तो अद्याप सुरू न झाल्याने सुमारे २० हजार शेतकरी सभासद व १ हजार कामगार यांच्या आशेवर सध्यातरी पाणी पडले आहे.
यासर्व कारणांमुळे जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. तालुक्यांतील अनेक लहानमोठ्या गावांमधून निघालेला कचरा रिचवण्यासाठी जागा अथवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध नसल्याने परिसरांतील जैविक आरोग्य धोक्यांत आले आहे. पुणे – सोलापूर, पुणे – अहिल्यानगर या दोन्ही महामार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी गाव तेथे उड्डाणपूल काळाची गरज बनली आहे याचबरोबर रेल्वेमार्गावर अनेेक ठिकाणी उड्डाणपूल उभारणे गरजेचेे आहे. २०१४ सालच्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये मतदारांनी त्यांचा राग मतदानाद्वारे व्यक्त करून राष्ट्रवादीला झिडकारले होते. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत परत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व आमदार निवडून आले. त्यांना शिरुर हवेली मतदारसंघात मताधिक्यही चांगले मिळाले. पक्ष बदलले, पक्षाचे नेते बदलले, खासदार – आमदार बदलले, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य बदलले. मात्र, पूर्व हवेलीतील सर्वच प्रश्न आजही कायम आहेत.
पुणे शहरांलगत २५ ते ३० किमी अंतरावर असलेल्या गावांना पुणे महानगरपालिकेने विनाअट पिण्यासाठी बंद नलिकेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अनेक वर्षापांसून सर्वच स्तरांतून होत आहे. नेत्यांना फक्त निवडणूक आली की, पाणीप्रश्न आठवतो. पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांनी वापरलेले व विविध कारखान्यांतून कोणतीही प्रक्रिया न करता जसेच्या तसे मुळा – मुठा नदीत पाणी सोडल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. त्यामुळे नदीतीरांवर राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर जुन्या कालव्यातून नदीचेच पाणी जसेच्या तसे सोडण्यात येत असल्याने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत दूषित होत आहेत. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींच्या जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित आहेत, त्यांनी शुद्ध पाणी पुरवण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणांत पाणीपट्टीमध्ये वाढ केली आहे. ते पाणी तुलनात्मक दृष्ट्या शुद्ध नसते. त्यामुळे जेथे जलशुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित आहेत व जेथे कार्यान्वित नाहीत तेथील ही नागरिकांना दूषित पाणीच प्यावे लागते.
नदी पलीकडील गावांत आजही भारनियमन होत असल्याने त्याचा परिणाम शेतीवर होत असून त्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. याचबरोबर पूर्व हवेली व शिरुर तालुक्यात असणारी छोटी-मोठी कारखानदारी व तेथे विविध प्रकारचे ठेके घेण्यासाठी स्पर्धा लागते. यात स्थानिक नेते पुढाकार घेतात. यापायी दोन गटांत अनेकदा वाद उदभवतात. येथील जमिनीला सोन्याचा भाव आल्याने भाऊबंदकीच्या वादाने कळस गाठला असून त्यामुळे अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचत आहे. यामध्ये जास्त प्रमाणांत राजकीय व्यक्ती अथवा त्यांचे आप्तेष्ट अथवा कार्यकर्ते असतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे काम वाढले आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून पुर्व हवेलीत दोन रिंगरोड प्रस्तावित आहेत. त्यांचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत ही लोकप्रतिनिधींची मानसिकता नसल्याने हवेलीतील जनतेसमवेत शेतकरीही हवालदिल झालेले आहेत. या सर्व ज्वलंत समस्यांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक झाली.
वरील सर्व प्रश्नांचे घोंगडे काही वर्षांपासून भिजत पडले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांना प्रलंबित प्रश्नांना भिडण्याची इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे. अन्यथा मागील दिवस पुढे म्हणण्याची वेळ शिरूर -हवेलीच्या नागरिकांवर येणार आहे.