भिगवण, (पुणे) : “कानून के हात लंबे होते है” या संवादा प्रमाणे भिगवण पोलिसांनी चोरीला गेलेला ट्रॅक्टरचा शोध घेऊन चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. 100 सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने भिगवण पोलिसांनी हि कामगिरी केली आहे. सोमनाथ भारत शिंदे (वय – 23, रा. शिंदेवस्ती बावडा ता. इंदापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस वाहतूकदार शेतकरी अक्षय अनिल राऊत (रा.केतुर ता. करमाळा) यांनी बारामती शेटफळ अग्रो कारखाना येथून आपला ट्रॅकटर हा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली होती. सदर घटनेचा भिगवण पोलीस तपास करीत असताना अग्रो कारखाना तसेच बावडा व इतर मार्गातील जवळपास 100 च्यावर सीसीटीव्हीची तपासणी करण्यास सुरुवात केली.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदार यांच्या माध्यमातून बावडा येथून सोमनाथ शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चौकशी केली असता शिंदे याने ट्रॅकटरला असणारी जी.पी.एस. सेवा भवानीनगर परिसरात काढून टाकल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलीस पथकाने संशयित चोरट्याला नळदुर्ग (ता. धाराशिव) येथे लपविलेला मुद्देमाल ताब्यात घेत कारवाई केली.
सदरची कामगिरी भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार महेश उगले, संतोष मखरे, सचिन पवार, प्रमोद गलांडे यांनी केली.