भिगवण : पोंधवडी गावच्या हद्दीत मोटार सायकल व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. काल(दि. 8) शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. अजय सुभाष शिंदे (वय 25 वर्षे रा. बिटले, ता. मोहेळ, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुलाचे वडील सुभाष दामोदर शिंदे यांनी याबाबतची फिर्याद भिगवण पोलीस ठाण्यात दिली.
भिगवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकल चालक अजय शिंदे हा पोंधवडी-अकोले रस्त्यावरील पवार वस्तीनजीक आपल्या केटीएम (MH 13 DD 9394)निघाला असता भरधाव जाणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टर ट्रेलरची त्याला जोरात धडक बसली. या अपघातात अजय याच्या तोंडास व डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक अपघातस्थळावून पसार झाला आहे. त्यामुळे अज्ञात ट्रॅक्टर चालकावरती गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खाडे हे करीत आहे.