बारामती: बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई बुधवारी(19 मार्च) ला ‘एसीबी’ने केली. बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला सहीसाठी 1 लाख 75 हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. विकास ढेकळे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अधिकारी बारामती मधील एका व्यायाम शाळेत एक लाख रुपये स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, बारामतीतीमधील एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची फाईल बारामती नगर परिषदेच्या नगररचना विभागामध्ये प्रलंबित होती. या फाईलवर सही करण्यासाठी नगर रचना विभागाचा अधिकारी विकास ढेकळे याने एक लाख 75 हजार रुपयांची लाच मागितली होती, या अधिकाऱ्याकडून होणाऱ्या नेहमीच्या त्रासामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती.
तडजोडी अंती ढेकळे याने एक लाख रुपये घेऊन सही करण्याची तयारी दर्शवली होती, त्यानुसार काल(19 मार्च) सायंकाळी सापळा रचत विकास ढेकळे याला बारामती शहरातील एका व्यायाम शाळेत एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले. या प्रकरणी बारामती पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.