पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील घडलेल्या अत्याचार घटनेनंतर स्वारगेट आगारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरीही महिला कंडक्टर सोबत धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्याहून स्वारगेटला गाडी घेऊन आलेल्या महिला कंडक्टर सुप्रिया फाळके या महिला कंडक्टरची बॅग आगारातून चोरीला गेली आहे. त्यामुळे पोलिसांचा कोणताही दरारा या परिसरात आता जाणवत नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्वारगेट आगारात घडलेल्या घटनेनंतर मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना एसटी महामंडळातील एका वाहकाची बॅग चोरीला गेली आहे. त्यामध्ये तीस हजार रुपयांची रोख रक्कम होती, पैसे असलेली बॅग चोरीला गेल्याने महिला कंडक्टर सध्या तणावात आहे. दरम्यान कालच्या घटनेला 30 तास उलटून गेले आहेत पण अत्याचार करणारा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. स्वारगेट बस आगारात कायम वर्दळ असते अशा ठिकाणी घडत असलेल्या घटनांनीं सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या घटलेल्या घटनेबाबत महिला कंडक्टर यांनी असे सांगितले की, मी स्वारगेटला पोहचले तेव्हा बॅग माझ्याकडे होती त्यात पैसे आणि ट्रे बॉक्स होता, त्यामध्ये तीस हजाराची रक्कम होती. मी वॉशरूमला गेले त्यानंतर परत आले तेव्हा बॅगच गायब झाली असा घटनाक्रम त्यांनी सांगितला. या अगोदर माझ्यासोबत कधीच असा प्रकार घडला नाही. घटनेची माहिती मी अद्याप एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली नसल्याची त्यांनी सांगितले. मात्र याबाबत आगार प्रमुखांना याची माहिती देणार असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान तगडा बंदोबस्त असूनही आगारात चोऱ्या होत असतील तर पोलिसांचा धाक राहिला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.