मोशी: गेली दोन-तीन वर्षांपासून आळंदी ते वाघोली ही बस सेवा सुरू होती. मरकळ येथील इंद्रायणी नदीवर असणारा पूल खचल्याचे कारण पुढे करीत सदरची बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर बाजूलाच नवीन पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. तीन वर्षे झाले तरी अजून पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे.
त्यामुळे जुन्या पुलावरून जड बंदी असल्याने पीएमपीएमएलच्या आळंदी ते वाघोली या बस सेवेमध्ये दोन पर्याय ठेवले होते. आळंदी ते मरकळ पूल व इंद्रायणी नदीच्या पलीकडे तुळापूर ते वाघोली अशी बस सेवा सुरू होती. प्रवाशांना रात्री अपरात्री पुलावरून पायी ये जा करावी लागत होती. सुरुवातीला सदरील पुलावर जड वाहनास बंदी घालण्यात आली होती.
मात्र काही कालांतराने या पुलावरून जड वाहने जाण्यास सुरुवात झाली. तरी देखील आळंदी ते वाघोली बस सेवेला सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) खात्याकडून जुना पूल वापरास योग्य आहे की नाही? याचा दाखला मिळत नव्हता. त्यामुळे जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नव्हते. परंतु शिरूर तालुक्याचे आमदार यांनी पुढाकार घेऊन गेल्या आठ दिवसांपासून सदरील बस सेवा पूर्वत करून आळंदी ते वाघोली दर अर्ध्या तासाला बस सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे विद्यार्थी, कामगारांसह प्रवाशांनी बस सेवा सुरु झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.