लोणी कंद, ता. 27 : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मॅजेस्टिक सोसायटीचे लेबर कॅम्पमध्ये सन 2021 साली घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
राजु पुनाराम मिर्झा (वय 30) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अनु महेंद्र शिवारे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाने लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी राजु मिर्झा हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. तर राजु मिर्झा हा बांधकाम मिश्त्री असून त्याने अनु शिवारे यांच्याशी प्रेमविवाह केला होता. राजु मिर्झा यांना रुद्र (वय 5), मयंक (वय 3) अशी दोन मुले आहेत. राजु मिर्झा याला दारूपिण्याचे व्यसन लागले होते. राजु मिर्झा याला पत्नी अनु शिवारे यांच्या चारित्र्याचा संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. राजु हा दारू पिल्यानंतर अनुला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. या भांडणाची माहिती अनुने फिर्यादी यांना दिली होती.
त्यानंतर फिर्यादी यांनी अनुला भांडणे टाळण्यासाठी घरी बोलाविले होते. अनु फिर्यादी यांच्या घरी राहत होत्या. अनु शिवारे या घरी एकट्या असताना, आरोपी राजु मिर्झा हा घरी आला. त्याच्यामध्ये पुन्हा चारित्र्याच्या संशयावरून भांडण झाले. यावेळी अनुचा कायमचाच काटा काढायचा म्हणून आरोपीने अनुच्या पोटात धारदार चाकूने वार केला. यावेळी अनु जोरजोराने ओरडू लागली. तेंव्हा फिर्यादी मदतीसाठी धावून आले असता, आरोपी राजु मिर्झा यांने अनुच्या पोटात चाकू खुपसला होता. फिर्यादी येताच आरोपी फरार झाला. अनुला उपचारासाठी त्वरित एका खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी राजु मिर्झा याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, लोणी कंद पोलिसांनी आरोपीला मोठ्या शिताफीने त्वरित अटक केली होती. सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील विद्या जाधव यांनी कामकाज पहिले. ॲड. विद्या जाधव यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालायने वरील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के एन शिंदे यांनी दिले आहेत.
दरम्यान, पुण्याच्या सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे ) राजेश तटकरे, पोलीस हवालदार प्रदीप कडुकर पोलीस अंमलदार गणेश दळवी, शुभांगी कुरंदळे यांची या खटल्यास सरकारी वकील ॲड. विद्या जाधव यांना बहुमुल्य मदत मिळाली.