लोणी काळभोर, ता. 20 : पुणे शहरात अवजड वाहनांना बंदी घातल्याने कवडीपाट टोलनाक्यापासून लोणी कॉर्नर पर्यंत सुमारे 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा गुरुवारी (ता.20) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास लागल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात अवजड वाहनांचे चालक भरधाव वेगाने गाडी चालवित आहेत. त्यामुळे शहरात होणारे अपघात टाळण्यासाठी रात्री अकरा वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अवजड वाहनचालक नियम तोडुन शहरात घुसत होते. त्यांना आळा घालण्यासाठी अवजड वाहने रोखून पुन्हा माघारी पाठविण्यात आलेली आहेत.
दरम्यान, कवडी पाट टोलनाक्यापासून वाहनांना पुन्हा माघारी पाठविण्यात येत असल्याने लोणी कॉर्नर ते टोल नाका या दरम्यान सुमारे 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या वाहतूक कोंडीत बस व कर्मचारी व खाजगी वाहनचालक अडकून बसले आहेत.